मुक्ताईनगर विशेष

Sunday, November 24, 2019

पवार स्क्वेअर व सत्ताकारण..


राज्यात निवडणूका झाल्यानंतर राज्यपालांनी आधी भाजपला सत्तास्थापनेसाठी बोलवले. त्यांनी देवेंद्र फडणवीस हे आमचे विधिमंडळ नेते आहेत असं आधी जाहीर केलं आणि नंतर आपण सरकार स्थापनेस असमर्थ आहोत असं कळवलं. 
त्या नंतर शिवसेनेला राज्यपालांनी बोलवले, त्यांनी एकनाथ शिंदे यांना त्यांचे विधिमंडळ गटनेते निवडले होते. आदित्य ठाकरेंसह एकनाथ शिंदे राज्यपालांना भेटून आले त्यांनी अवधी वाढवून देण्याची विनंती केली पण राज्यपालांनी २४ तासाची मुदत वाढवून दिली नाही. 
त्या नंतर राष्ट्रवादीस राज्यपालांनी निमंत्रित केलं, त्यांचे गटनेतेपदी निवडले गेलेल्या अजित पवार यांनी आणखी दोन दिवसाची वेळ वाढवून देण्याची मागणी राज्यपालांची २४ तासांची मुदत संपण्याआधीच केली, पर्यायाने राज्यपालांनी राष्ट्रवादी मुदतीत सरकार स्थापनेस असमर्थ असल्याचा अहवाल केंद्राला दिला आणि पुढील कार्यवाही सरकारच्या अपेक्षेनुसार होत राष्ट्रपती राजवट लागू झाली. 

इथून पुढे मूळ मुद्दा येतो -

२२ नोव्हेंबर रोजी अजित पवार यांनी फडणवीस यांची भेट घेऊन आपण त्यांना पाठिंबा देत आहोत असं सांगून हातमिळवणी केली. फडणवीसांनी सत्तास्थापनेचा दावा केला आणि रातोरात राष्ट्रपती राजवट हटवली गेली, सकाळी शपथविधी झाला देखील !
अजित पवार यांनी एकट्याने बंड केले काय किंवा त्यांच्यासोबत दहा बाराच आमदार होते की काय याला आता अर्थ उरला नाही कारण फडणवीस यांना अजित पवार जेंव्हा भेटले तेंव्हा ते केवळ राष्ट्रवादीचे एक आमदार वा दहाबारा आमदारासह बंड केलेले आमदार म्हणून नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांचे गटनेते म्हणून भेटले.
अजित पवार हेच राष्ट्रवादीचे गटनेते असल्याची नोंद सरकारदरबारी केली गेल्याने त्यांनी सोबत आणलेला ५४ आमदारांच्या सह्यांचा कागद ही राष्ट्रवादीची अधिकृत कायदेशीर भूमिका मानावी लागेल (कारण ते त्यांच्या पक्षाचे गटनेते आहेत आणि त्यांच्याकडे असलेला कागद खऱ्या स्वाक्षऱ्यांचा आहे). 
दरम्यान अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या अकरापैकी पाच आमदार शरद पवार यांच्याकडे ( मूळ राष्ट्रवादीकडे) परत आल्याचं दिसलं पण याला कायदेशीर मूल्य नाही कारण त्यांच्या सहीचा कागद त्यांच्या गटनेत्याकडे आहे जो त्यांनी फडणवीस यांच्या समर्थनार्थ राज्यपालांकडे दिलेला आहे. 

आता पुढची घडामोड -
२३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होऊन त्यात जयंत पाटील यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड होऊन अजित पवार यांची त्या पदावरून हकालपट्टी केली गेल्याचे पक्षाकडून जाहीर केलं गेलं. 

इथे मेख आहे - 
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार त्यांना हवा तो आमदार सदस्य त्यांच्या गटनेतेपदी निवडू शकतात. 
जर विधिमंडळ कामकाज सुरु असताना नवीन निवड केली गेली असल्यास त्यांनी निवड केलेलं नेत्याचं नाव विधानसभा अध्यक्षांकडे रीतसर नोंद करावे लागते आणि पूर्वीच्या गटनेत्याचे नाव काढण्यासाठी रीतसर प्रक्रिया पार पाडावी लागते. जो पर्यंत विधानसभेच्या विधीमंडळ कामकाजात त्याची नोंद होत नाही तोवर नवा गटनेता त्या अधिकाराने कामकाज करू शकत नाही. 
जर नवी विधानसभा अस्तित्वात येण्याआधी अशी घडोमोड झाली तर काय होते - नव्या विधानसभेचे कामकाज अध्यक्षनिवडीतून सुरु होते, ते नव्या सदस्यांना शपथ देतात आणि त्यानंतर गरज असेल तर विश्वासमत प्रस्ताव पारित होऊन पुढील कामकाजास सुरुवात होते.

सध्याच्या घटनेत राज्यपालांनी विधानसभा अस्तित्वात येण्याआधीच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली, त्यानंतर काँग्रेस वगळता अन्य मुख्य पक्षांच्या गटनेतेपदाची निवड होऊन त्याची नोंद राज्यपालांकरवी सत्तास्थापनेच्या दाव्या दरम्यान केली गेलीय.

आता जर राष्ट्रवादीला अजित पवार यांना गटनेते पदावरून काढून टाकावे वाटत असेल तर ते काढू शकतात यात असंभव काहीच नाही. तसं त्यांनी केलं देखील पण - 
हा पणच खूप महत्वाचा आहे. 
अजित पवार यांची एकदा केलेली सरकार दरबारची नोंद रद्द करायची असेल तर रितसर याचिका करावी लागेल, ही याचिका नव्या विधानसभेच्या अध्यक्षांसमोर मांडावी लागेल. राष्ट्रवादीच्या आमदारांचे बहुमत ज्याच्या नावाने असेल त्याचे नाव नवा गटनेता म्हणून अध्यक्षांना मान्य करावे लागेल. पण जोवर विधानसभेच्या अध्यक्षांची निवड होत नाही तोवर आधी केलेली गटनेत्याची निवड कायदेशीर रित्या रद्द होत नाही. 

थॊडक्यात सांगायचे झाले तर आता जयंत पाटील यांची जरी गटनेता म्हणून निवड केली गेली असली तरी ती सरकार दरबारच्या कागदोपत्री नोंदीत नाही सबब सरकार दफ्तरी ज्यांची (अजित पवार) नोंद गटनेता म्हणून आहे तेच त्या पदावर राहतील जोवर विधानसभा अध्यक्ष नव्या नावास मंजुरी देत नाहीत तोवर त्यांना त्या पदावरून कुणी अधिकृत रित्या हटवू शकत नाही. जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित गटनेते आहेत पण त्यांना अधिमान्यता नाही असा याचा सरळसरळ अर्थ होतो.     

आत पुढची मेख - 
नव्या विधानसभेचे अधिवेशन राज्यपालांद्वारे बोलवलं जाईल. त्यात अध्यक्षनिवड होतानाच मोठी गोची होणार आहे. अध्यक्षनिवड करताना जर फडणवीस यांनी पसंती दिलेल्या भाजपच्या आमदारास मतदान करावे असा व्हीप अजित पवार यांनी काढला तर (गटनेता या नात्याने त्यांना तो अधिकार आहे आणि ते पक्षहितासाठी तो अधिकार वापरू शकतात अशी तरतूद आहे) त्या व्हीपच्या विरोधात मतदान केल्यास  पक्षांतर बंदीच्या कायद्यान्वये त्यांचे सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते तशी तरतूदच आहे.
 
गोची - 
याचाच अर्थ असा की जर अजित पवारांनी काढलेल्या संभाव्य व्हीपविरोधात मतदान केले तर सदस्यव रद्द होण्याची टांगती तलवार राष्ट्रवादीच्या आमदारांच्या डोक्यावर आहे. 
शरद पवार यांच्या प्रेमाखातर सदस्यत्व पणाला लावून काही आमदार 'शहिद' झाले सदनाचे संख्याबळ कमी होईल आणि भाजपचे काम सोपे होईल !
म्हणजे आत परिस्थिती अशी आहे की काहीही झालं तरी भाजपचे विधानसभा अध्यक्ष होतील आणि अर्थात सीएमही त्यांचेच राहतील. 

नंतर या सर्व गोष्टींचा कायदेशीर किस पडत राहील, दावे प्रतिदावे होतील, जनता फार दिवस डोक्यात ठेवत नाही हे यांना ठाऊक असते. वर्षभरानंतर हे लोकांच्या अंगवळणी पडून गेलेले असते. लोक रोजच्या लढाईत व्यग्र असतात ते कमाईत दंग असतात !

आता थोडं मागं जाऊयात ... 
 १३ नोव्हेंबर २०१४ रोजी पंधराव्या विधानसभेत विधानसभा अध्यक्षांच्या बिनविराेध निवडीनंतर विराेधी पक्षनेतेपदाची निवड हाेणे अपेक्षित असताना ते टाळून अध्यक्षांनी थेट विश्वास प्रस्ताव मांडण्यास मंजूरी दिली. त्यामुळे विधानसभेत एकच गाेंधळ झाला. या गाेंधळातच शिवसेनेने विरोधात मतदान केले होते, काँग्रेसनेही विरोधात मतदान केले होते पण पवारांनी आपली ताकद भाजपमागे लावली होती. अशा रीतीने विश्वासमत प्रस्तावात फडणवीस राष्ट्रवादीमुळे उत्तीर्ण झाले. अध्यक्षांनी विश्वास प्रस्ताव मंजूर झाल्याचे जाहीर केले व पाठाेपाठ विरोधी पक्षनेते पदी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांची निवडही जाहीर केली.

आता काय होणार आहे ते पहा - 
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल, भाजप उमेदवारास सेना काँग्रेस विरोध करेल आणि जे राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांच्या व्हीपविरोधात जातील त्यांचे सदस्यत्व रद्द होईल, सदनाची सदस्यसंख्या घटेल आणि भाजप जिंकेल. जर व्हीपचे पालन केले तर भाजपच निर्विवादपणे जिंकेल. २०१४ ला जसे घडले होते तसेच घडताना एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षनेते होतील !

फरक इतकाच असेल की तेंव्हा सेना नेतृत्वाने पॅचअप करत सत्तेत सहभाग घेतला होता. आता त्यांची दारे बंद झालीत त्यांची जागा खुलेआम राष्ट्रवादी वा अजितपवारांच्या आडून छुप्या पद्धतीने राष्ट्रवादीच घेईल !

मतदारांनो तुमचा आणि सेनेचा गेम झाला आहे, गेम कुणी केला आहे याचा अन्वयार्थ ज्याने त्याने आपल्या राजकीय पसंतीनुसार लावला तरी हरकत नाही कारण त्याने काहीच फरक पडत नाही.. 

- समीर गायकवाड

निरीक्षण -  हे सर्व अगदी ठरवून टप्प्या टप्प्याने अंमलात आणले गेलेय असं वाटण्यास जागा आहे. याची सुरुवात ईडीच्या पवारनाट्यापासून झाली असावी. त्याचदिवशी या सगळ्याला उद्विग्न होऊन अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. ते भावुक झाले होते, ती ठरवून केलेली नौटंकी नसावी. हे त्यांना पटलं नसावं. दिल्लीवारीत त्यांना कायदेशीर कारवाईचा बडगा दाखवून राजी केलं गेलं असावं, मग पुढचं सगळं ठरलेल्या क्रमानुसार घडत गेलंय. अगदी राज्यपालांनी सगळ्या पक्षांना एकेक करून बोलावणं हा त्या नाट्याचाच एक भाग असावा. या टप्प्यात अजितदादांची गटनेता म्हणून दफ्तरी नोंद शक्य झाली. कदाचित इथेच काँग्रेसला काहीतरी वेगळं शिजत असल्याचा अंदाज येत होता म्हणून त्यांनी कमालीची सावध पावले टाकली. इव्हन त्यांनी आपला गटनेता देखील निवडला नाही ! राजकीय छक्केपंजे न समजलेली शिवसेना मात्र फरफटत गेली. या स्क्रिप्टमधला अखेरचा टप्पा ३० नोव्हेंबर रोजी अंमलात येईल. तुफान नौटंकी होईल, कोर्टबाजी हॊईल पण जे नियमात असेल तेच होईल. इतकं जबरदस्त स्क्रिप्ट लिहिणाऱ्या दिग्गज असामींनी सगळे कायदे नियम कोळून पिल्यावरच हे घडवून आणलेले असते त्यामुळे याचा शेवट काय असेल हे चाणाक्षांनी ओळखले असेलच !

Sunday, November 17, 2019

मुक्ताईनगर चिंचखेडा खुर्द येथे हरणाच्या हल्ल्यामुळे दोन-जन गंभीर  तर एक किरकोळ जखमी


मुक्ताईनगर
   तालुक्यातील कुरा काकोडा येथील दोन युवकांना हरणांचा कळप रस्त्यावर आडवा आल्याने मोटरसायकलचा अपघात होऊन गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चिंचखेडा खुर्द गावाजवळील नाल्याजवळ कुऱ्हा खांडवी रस्त्यावर घडली.
  तालुक्यातील कुर्‍हा काकोडा येथील दिलीप महादेव गोसावी वय 35 तर गणेश अशोक गोरले वय 35 हे दोघे तर विजय नंदेवार हे किरकोळ जखमी झाले खामगाव येथून मोटर सायकलने कु-हा येथे येत असताना असताना काल रात्री   चिंचखेडा खुर्द या दरम्यान हरणाचा कळप आडवे  आल्यामुळे हरण वन्यप्राणी त्यांना गंभीर जखमी  याने सदरील दोन्ही जणाला जखमी केले हे त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या  होते ग्रामस्थांनी त्यांना वडोदा येथील सरकारी उपकेंद्रात  केंद्रात नेले बेशुद्ध अवस्थेत ग्रामस्थांनी नेले असता  केंद्र ही बंद असल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात मलकापूर येथे हलवण्यात आले होते सदरील जखमी ची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे उपचारार्थ पैसे नसल्यामुळे दोन्ही रुग्ण हे घरी पडलेल्या अवस्थेत आहे त्यांना वनविभागाने तातडीने मदत देण्याची मागणी नागरिकांकडून केली आहे.
    कुरा ते खांडवी रस्त्यावर मुक्ताईनगर तालुका अंतर्गत येणारे वडोदा वनपरिक्षेत्र असल्याने सदर रस्त्यावर वन्यजीव प्राण्यांची नेहमीच वर्दळ असते. रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांच्या शेता चे नुकसान देखील वन्य प्राण्यांमध्ये मुळे होत असते.तसेच हरिण, सांबर ,काळवीट यासारखे तृणभक्षी प्राणी हे रस्ता ओलांडून दुसऱ्या शेतांमध्ये जात असताना असे अपघाताचे प्रकार अनेक वेळेस घडत आहे. सदर युवकांची परिस्थिती हलाखीची असून त्यांना वन विभागातर्फे तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी जखमींच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.

पवार स्क्वेअर व सत्ताकारण..

राज्यात निवडणूका झाल्यानंतर राज्यपालांनी आधी भाजपला सत्तास्थापनेसाठी बोलवले. त्यांनी देवेंद्र फडणवीस हे आमचे विधिमंडळ नेते आहेत असं आधी जाही...